
मुलांनो, आज मी तुम्हाला बोधीची गोष्ट सांगणार आहे. बोधी यवतमाळच्या भोसे गावात राहतो. भोसे गावाजवळ निलोण्याचे जंगल आहे. बोधी छोटा असताना त्याने या जंगलात अनेक वणवे पाहिले. वणव्यांमध्ये जंगलातली मोठ मोठी झाडे नष्ट व्हायची, जंगला मधले प्राणी अन्नाच्या शोधात गावाकडे यायचे आणि गावकऱ्यांवर, त्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले चढवायचे. गावकरी जंगलातील मोठ्या झाडांची तोड करायचे. छोटा बोधी हे पाहून अस्वस्थ होई आणि सतत आपल्या आईशी याबाबत बोले.
बोधीची आई त्यांला झाडे, निसर्ग, पर्यावरण यांचे संरक्षण आणि संवर्धन याबद्दल माहिती देत असे. यवतमाळ मधील वणव्यात नष्ट झालेली झाडे आणि जंगले यात कशी वाढ करता येईल यासाठी बोधी विचार आणि प्रयत्न करू लागला. 2013 मध्ये त्याच्या शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात बोधीने बियांचा चेंडू (सीड्स बॉल) हा प्रोजेक्ट मांडला. सीड्स बॉलचा वापर मोठ्या प्रमाणावरील वृक्ष लागवडीसाठी कसा करता येईल याचे त्याने प्रात्यक्षिक दिले. त्याची ही कल्पना अनेकांना आवडली.
एवढ्यावरच ना थांबता बोधीने सतत त्यावर निरनिराळे प्रयोग केले आणि ग्रीन पाऊच म्हणजे हिरवा बटवा आणि मॅजिक सॉक्स म्हणजे जादूही मोजा या मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याच्याअजून काही पद्धती शोधल्या. हिरवा बटवा (ग्रीन पाऊच) या पद्धतीमध्ये सुती कपडे, वर्तमानपत्राचे तुकडे, झाडाच्या बिया, छोटा दोरा, कंपोस्ट किंवा शेणखत आणि माती याच्या साह्याने एक छोटासा बटवा तयार केला जातो आणि तो झाड लावण्यासाठी वापरला जातो. जादुई मोजा (मॅजिक सॉक्स) या पद्धतीमध्ये झाडाच्या बिया, कंपोस्ट किंवा शेणखत आणि माती यांच्यामध्ये मिसळून मोज्यामध्ये भरले जाते आणि तो मोजा ज्या ठिकाणी झाडांची लागवड करायची आहे त्या ठिकाणी भिरकावला जातो. पावसाळ्यामध्ये ही झाडे रुजून येतात. बोधीने अनेक सार्वजनिक मंचावरून आणि शाळांमधून या पद्धतीची माहिती लोकांना दिली, प्रात्यक्षिक करून दाखवले. शाळांमध्ये, शाळेच्या प्रतिज्ञा बरोबरच बोधी जंगल आणि पाणी वाचवण्याची प्रतिज्ञा मुलांकडून करून घेत असे. पाहता पाहता मदतीचे हजारो हात त्याच्या पाठी उभे राहिले.
बोधी आणि त्याच्यामुळे प्रेरित झालेल्या छोट्या दोस्तांनी यवतमाळच्या आजूबाजूच्या परिसरातील हिरवाईचे क्षेत्र लक्षणीय रित्या वाढवले. बोधीच्या या कामाची दखल अनेक संस्थांनी घेतली त्याला अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आले त्यापैकी काही पुरस्कार असे –
* यंग इको हिरो अवॉर्ड
* विक्रम साराभाई फाउंडेशनचा कलाम स्मृती आयडियेट नॅशनल अवॉर्ड
* इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यंगेस्ट मॅसेंजर ऑफ सोशल फॉरेस्टेशन
* डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इग्नाइटेड माईंड चिल्ड्रेन क्रिएटिव्हिटी अँड इनोवेशन नॅशनल अवॉर्ड, 2020
तसेच युनिसेफ, द युन, द युनायटेड नेशन्स रिपोर्ट 7 यासारख्या नावाजलेल्या संस्थांनी त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे.
बोधीचे काम इतके प्रेरणादायी का आहे हे आता तुम्हाला समजले असेलच पण त्याने पर्यावरणाच्या प्रश्नावर कशी उत्तरे शोधली तेही तुम्ही समजावून घ्या. लेखाचा पुढचा भाग थोडासा अवघड आहे पण तुमचे आई-बाबा, शिक्षक यांच्या मदतीने तो समजावून घ्या.
छोट्या बोधीला जेव्हा कमी होत जाणारी जंगले, वणवे, वन्य प्राण्यांचे शेतकरी आणि गावकऱ्यांवर होणारे हल्ले हे प्रश्न कळाले तेव्हा त्याने त्याची उत्तरे शोधण्याचा निश्चय केला. याला सोल्युशन ओरिएंटेड माईन्डसेट म्हणतात – म्हणजे उत्तरे मिळवण्याची मनोरचना. एकदा तुम्हाला समस्या कळाली, की तुम्ही तुमचे विचार प्रश्नांवरून त्या प्रश्नांची उत्तरे हुडकण्याकडे केंद्रित केले पाहिजे. अशी उत्तरे मिळवताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्या पुढील प्रमाणे –
1) मार्गदर्शन – मार्गदर्शन म्हणजे गायडन्स- छोट्या बोधीने सर्वप्रथम जेव्हा सीडबॉलची कल्पना मांडली त्यानंतर त्याने आपली आई, शिक्षक, कृषीतज्ञ यांचे मार्गदर्शन घेतले. स्वतः अनेक प्रयोग केले आणि आपल्या वृक्षारोपणाच्या पद्धतीमध्ये सतत सुधारणा केल्या. यामध्ये ‘सतत सुधारणा करणे’ ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण ज्या गोष्टीचा उत्तर म्हणून विचार करतोय, त्यात काही त्रुटी आहेत का? त्यातल्या तज्ञ व्यक्ती कोण आहेत? कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत? यावर विचार केला पाहिजे आणि त्यात सतत सुधारणा केली पाहिजे.
2) जगभरातील काम – यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल मित्राची मदत घ्यावी लागेल. या प्रकारच्या समस्यांवर जगभरात काही काम झाले आहे का? त्यांनी कुठल्या पद्धती वापरल्या होत्या? त्यांना त्याचे कसे रिझल्ट्स म्हणजे परिणाम मिळाले हे पाहिले पाहिजे. गुगल बाबा याबाबतीत माहितीचा प्रचंड खजिना मिळवून देऊ शकतो. या माहितीच्या आधारावर तुम्ही कुठली पद्धत विकसित करायची किंवा कुठल्या पद्धतीवर प्रयोग करायचे हे निश्चित करू शकता.
3) उपयुक्तता – जो पर्याय आपण निवडला आहे तो आपल्या प्रदेशातील हवामान, वाहतूक, मनुष्यबळ याला अनुकूल आहे का हे तपासले पाहिजे. बोधीने वनीकरणाच्या पाच पद्धती विकसित केल्या आहेत. या सर्व पद्धती अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या आहेत, तसेच त्या पर्यावरण पूरक आहेत. लक्षात ठेवा, साध्य जितके महत्त्वाचे असते तितकेच साधनही. पर्यावरणाची समस्या सोडवणारे साधन, हे कुठल्याही प्रकारे पर्यावरणाची हानी करणारे असेल तर त्यात काही अर्थ नाही. त्या दृष्टीने तुमच्या उत्तराची उपयुक्तता तपासली पाहिजे.
4) उत्पादनखर्च – भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बोधीच्या वृक्ष लागवडीच्या पद्धती वाया जाणाऱ्या वस्तू पासून बनलेल्या असल्याने त्यांचा उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे. मोठमोठ्या खार्चिक उपायांसाठी लागणारा पैसा नेहमी उपलब्ध होईलच असे नाही पण एखादे चांगले काम सुरू केले की मदतीचे हजारो हात आपसूक उभे राहतात. वरील सर्व गोष्टींची काळजी घेतल्याने बोधीच्या पद्धती सर्वमान्य झाल्या आणि अत्यंत उपयुक्त ही ठरल्या.
छोटा बोधी आता बोधी दादा झाला आहे. बोधिसत्त्व खंडेराव या नावाने गुगल सर्च केला तर त्याचे अनेक व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला मिळेल. बोधिसत्त्व सारख्या मुलांपासून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या निसर्गासाठी प्रेरणादायी काम करा.
प्रश्नावरती विचार करा ..
उत्तराचा शोध घ्या ..
प्रयोग करा आणि मार्गदर्शन घ्या ..
सुधारणा करा ..
उत्पादन खर्च आणि उपयुक्तता पडताळून पहा ..
प्रेरणादायी व्हा..
जगातले बदल यामुळेच घडून येतील.

Khup bhari gosht, mulana khup avadli!!