शिक्षणाचे उद्दिष्ट काय? सुजाण नागरिक घडवणे. सुजाण म्हणजे ज्याला बऱ्या वाईटाची जाण आहे, ज्याची सदसद्विवेकबुद्धी शाबूत आहे असा नागरिक. मराठी मध्ये एक सुंदर शब्द आहे -नीरक्षीरविवेक. असे म्हटले जाते की, हंसाला एक विशेष देणगी आहे. दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून हंस आपल्या चोचीने दूध आणि पाणी वेगवेगळे करू शकतो. याचा खरा अर्थ असा की, चांगले आणि वाईट यातील भेद समजण्याची क्षमता असणे. त्याला नीरक्षीरविवेक असे म्हटले जाते. असा प्रकारचा विवेक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, हे शिक्षणा कडून अपेक्षित आहे. केवळ इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित यांच्या अभ्यासाने असा सुजाण नागरिक घडू शकेल का? जगण्यासाठी मदत करणारे, एक नागरिक म्हणून, माणूस म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारे विषय शिक्षणात जोवर अंतर्भूत केले जात नाही तोवर ही प्रक्रिया चालू होणार नाही.
शिक्षणातून विवेक, विचार, नैतिकता, कार्यक्षमता, सभ्यता, दयाळूपणा, माणुसकी यांचे संस्कार व्हायला हवे. शिक्षणातून शहाणपणा येतोच असा नाही. ‘ऐसपैस शिक्षण’ या संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकात एक गोष्ट आहे. एका गावामध्ये झाडे लावायचे काम करायचे होते. त्यासाठी काम करणाऱ्या माणसांचे तीन गट करण्यात आले. एका गटानी खड्डा खणायचा, दुसऱ्या गटानी त्यात झाडे लावायची आणि तिसऱ्या गटानी तो खड्डा बुजवायचा अशा प्रकारे झाडे लावली जाणार होती. एके दिवशी झाडे लावणारा गट रजेवर होता, तर पहिल्या गटातील लोकांनी नुसतेच खड्डे खोदले आणि तिसऱ्या गटातील लोकांनी खोदलेले खड्डे बुजवले. म्हणजे त्या दिवशी झाडे लावलीच गेली नाहीत. अशा प्रकारचे सांगकाम्या काम करून कुठलेही शहाणपण मिळवता येणार नाही. यातून शिक्षणाचा खरा उद्देश वाया जातो.
पूर्वीच्या पिढीमध्ये हा प्रश्न फारसा आला नाही कारण आपल्या आजोबांच्या किंवा मागच्या पिढीमध्ये शिक्षितांचे प्रमाण कमी असले तरीसुद्धा नैतिक मूल्ये मोठी होती. शिकलेल्या लोकांमध्ये आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हावा ही भावना प्रकर्षाने होती. ज्या ज्या लोकांना शक्य झाले त्यांनी आरएसएस , राष्ट्र सेवा दल, किंवा इतर संघटनांमध्ये सहभागी होऊन सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला. या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तींच्या आचरणाचा फार मोठा परिणाम मुलांच्या मनावर झाला आणि ती संस्कारशील बनली. मग आज शिक्षणाचे आणि साक्षरतेचे प्रमाण इतके वाढलेले असतानाही भ्रष्टाचार, गुंडगिरी, गैरवर्तन, बळजबरी, हिंसाचार यांचे प्रमाण कसे काय बरे वाढले आहे?
असे म्हणताना हेही लक्षात घेतले पाहिजे की या पिढीसमोरची आव्हाने वेगळी आहेत. तंत्रज्ञानात अतिशय हुशार असलेल्या या पिढीचे जीवन अतिशय गुंतागुंतीचे आणि गतिमान आहे. कुटुंबे छोटी झाली त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सहजगत्या वेगवेगळ्या वयोगटातील अनुभवी व्यक्तींकडून जो सल्ला किंवा समुपदेशन मिळायचे ते बंद झाले. वाढलेली स्पर्धा आणि त्यामध्ये यश मिळवण्यासाठी असलेला दबाव याचा मोठा ताण मुलांच्या मनावर आहे. यशाची व्याख्या सुद्धा पैसे आणि सत्ता या भोवती केंद्रित झालेली आहे. गरिबांचे अनेक प्रकारे शोषण होते आणि शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था यापैकी कुठलेही काम पैशाच्या अभावी होऊ शकत नाही हे आजच्या जगाचे वास्तव आहे. त्यामुळे पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे मग तो कुठल्याही मार्गाने का मिळवलेला असेना अशी या मुलांची धारणा झाली आहे. यात या मुलांची काही चूक नाही. आपली पिढीच या मुलांसाठी चांगली समाजव्यवस्था निर्माण करण्यात कमी पडली आहे.
पूर्वी शाळांमध्ये मूल्यशिक्षण या विषयाचा समावेश करण्यात आला होता. या तासाला मुलांना श्रमसंस्कार शिकवला जाई. मुलांकडून शाळेची स्वच्छता करून घेतली जाई. सर्वधर्म भाव, राष्ट्रभक्तीपर गाणी, भजने, सांस्कृतिक गाणी, बसवली जात. थोरा मोठ्यांची चरित्रे यांचे वाचन करून घेण्यात येई. आता हा विषय शाळेत शिकवण्यात येतो का नाही माहिती नाही, पण बदलत्या काळानुसार खालील विषयांचा समावेश शाळेच्या अभ्यासक्रमात करता येईल
नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य पालन
सामाजिक न्याय
राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान
नागरिकांचे हक्क आणि जबाबदारी
भावनांचे व्यवस्थापन
ताणतणावांचे व्यवस्थापन
यश किंवा अपयश हाताळण्याचे तंत्र
माहिती तंत्रज्ञानाची ओळख
आंतरजालातील आर्थिक फसवणुकीच्या शक्यता
आभासी जगात वावरताना घ्यायची काळजी
सेंद्रिय शेती आणि रासायनिक खतांचा वापर
पर्यावरण आणि प्रदूषण
कचरा व्यवस्थापन,
जलसंवर्धन,
सामाजिक वनीकरण
अन्नातील पोषणमूल्ये आणि स्वयंपाक
व्यायाम आणि योगासने
प्रथमोपचार, सीआरपी, आग विझवण्याच्या साधनांचा वापर इत्यादी
केवळ पाठांतरावर भर न देता शिक्षणाने मुलांना आयुष्याला सामोरे जाण्यासाठीचे बळ दिले पाहिजे. भविष्यातील अडचणींना, आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक तयारी शिक्षणातून झाली पाहिजे. तरच त्याला खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल.
